रे जाग यौवना रे....!!
(वृत्त- आनंदकंद)
रे जाग यौवना रे, ही साद मायभूची
आव्हान पेलुनीया, दे आस रे उद्याची
रे जाग यौवना रे ... ॥धृ०॥
झटकून मळभटाला, चैतन्य खळखळावे
भटकून आसमंती, हे रक्त सळसळावे
तारूण्य तेच जाणा, जे धडपडे सदाची
रे जाग यौवना रे ... ॥१॥
आता कवेत घे तू, अश्रांत सागराला
कापून लाट-धारा, तू खोल जा तळाला
रोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची
रे जाग यौवना रे ... ॥२॥
आकाश अंथरोनी, तार्यांस घे उशाला
बाहूत सुर्यचंदा, पाताळ पायशाला
विश्वा प्रकाश दे तू, तू ज्योत शारदेची
रे जाग यौवना रे ... ॥३॥
तू वीर मायभूचा, बलसागराप्रमाणे
यत्नास दे उजाळा, युक्ती-बळा-श्रमाने
अभये महान शक्ती, हो शान भारताची
रे जाग यौवना रे ... ॥४॥
गंगाधर मुटे
No comments:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.