Thursday, 10 June 2010

कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका

कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका

राजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता
खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता
काय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

इंग्रज होते, लूटत होते, येथिल कच्च्या माला
पक्का करूनी, चौपट दामा, विकत ग्राहकाला
काय निराळे आज आढळे, तितुकेची बोलावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

रेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते
कोर्ट-कचेर्‍या अन नोकर्‍या, त्याही गोर्‍या हस्ते
काय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे ..!!

टीव्ही आली, संगणक आले, आली कॉटन-बीटी
इलेक्ट्रॉनने झेप घेतली, तुमचे योगदान किती?
काय निराळे तुम्ही मढवले, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

काय झाले ग्रामोदयाचे? कुठे बुडाला चरखा?
स्वदेशी ते काय उरले, बघा काढुनी बुरखा
दिवे तुम्ही किती लावले, अभयाने दावावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

गंगाधर मुटे.
……………………………………

No comments:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.