माझ्याबद्दल थोडेसे..




नमस्कार मित्रहो..

नमस्कार मित्रहो,
ही माझी छोटीसी दुनिया…
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले मन:पुर्वक स्वागत..
मित्रहो,
मी हाडाचा ना कवी ना लेखक.
मी आहे एक हाडा-मांसा-रक्ताचा शेतकरी.
शेतकरी कुटूंबात जगतांना जे पाहीलं,अनुभवलं,
ते बरं-वाईट वास्तव प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न करतोय.
त्यासोबत काही न उलगडलेली उत्तरे शोधायचा प्रयत्नही करतोय.
……………

मित्रहो,
तिन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं एक माझं छोटसं गाव. जन्म आणि बालपण येथेच गेलेलं. महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर मार्केटींग क्षेत्रात नोकरी करतांना थोडाफ़ार काळ शहरात गेलेला. पण काही अपरिहार्यतेमुळे पुन्हा गावाकडे पावले वळली आणि येथे स्थायिक झालो तो कायमचाच.
कविता,गाणी व भजने लिहिण्याची बालपणी खुप आवड होती. मजा वाटायची, आनंद लुटायचो पण बालपण संपायच्या आतच ’भाकरीचे प्रश्न’ निर्माण झालेत आणि ’भाकरीचा शोध’ घेता-घेता उरलेलं बालपण,तरूणपण यांची पुरती वाट लागली, अगदी जळून राख झाली. आणि त्यासोबतच कविता,गाणी व भजने लिहिण्याची ऊर्मी,प्रेरणा कुठे व कशी गहाळ झाली ते कसे म्हणुन कळालेच नाही.

“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारूण्य जाळतांना.”


अशी ’आयुष्य कोमात’ गेलेली अवस्था दोन-चार वर्षे नव्हे तर चक्क दोन तपाला पुरून उरेल एवढा काळ कायम होती.
काळाच्या प्रवाहात भाकरीचा प्रश्न सुटला. आयुष्यात जे जे हवे ते ते मिळाले. पण कविता करण्याची प्रेरणा मात्र करपूनच गेली होती. मी कवितेला अन कवितेने मला पुर्णत: एकमेकांना विसरलोच होतो.पाऊलखुणा सुद्धा उरल्या नव्हत्या. याजन्मी भेटगाठ होईल असेही वाटलेच नव्ह्ते कधी.
एका अर्थाने आयुष्य संपलेच होते.
पण …..
काही दिवसापुर्वी अपघाताने मराठी संकेतस्थळ “मायबोली” वर गेलो. तेथे रमलो आणि चमत्कारच झाला.
पुन्हा एकदा आयुष्याला नवा टर्निंग पॉईंट मिळाल्याचा भास होतोय.
पुन्हा एकदा नव्या जोमाने “ते” बालपण परत आल्यासारखे वाटतेय.
जीवनाचे सर्व रंग माझ्या भोवताली फ़ेर धरून नाचतात असा आभास होतोय.
आणि जी कविता खुप दूर निघून गेली होती ती आता खुणावत असल्याची स्वप्ने पडायला लागलीय.
.
पण हे मी तुम्हाला का म्हणुन सांगतोय? कशासाठी सांगतोय? आत्मस्तुती की आत्मगौरव? मनशांतीसाठी की मनमोकळे करण्यासाठी? निष्कारण बडेजाव की शब्दपाल्हाळ?
प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एकच…..
ही कहानी माझी एकट्याची नाही.या देशात सत्तर टक्के जनता ज्या तर्‍हेने जीवन जगत्येय ते पाहता ही बहूसंख्य घरातील कहानी आहे.
चार भिंतिच्या आत अशा कहाण्यांचा जन्म होतो आणि चार भिंतिच्या आतच कहानीचा शेवट.
अशा कहाण्यांना वाच्या फ़ुटावी. काही ठोस उपाययोजना व्हाव्या या आशेने या चार भिंतिच्या आतील दु;खाचे उदात्तीकरण करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
……
मित्रहो,
आपणास माझे काव्य आवडले तरी आणि
ना-आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या…

गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा.
gangadharmute@gmail.com

    4 comments:

    1. गंगाधरजी, मस्त साईट आहे तुमची.. नागपुरी तडका तर लाजवाब.... :)

      ReplyDelete
    2. नमस्कार गांगाधारजी,
      मी सुद्धा वर्हाडातल्या एक शेतकर्याचा मुलगा पण आता प्रौढ आहे. आपल्या कविता मी नेहमीच वाचतो व ऐकतो.
      आमच्या वेळी प्रो. देविदास सोटे वर्हाडी कविता लिहित असत. मला त्यांच्या कविता खूप आवडायच्या. पण बराच काळ नोकरीनिमित्त बाहेरदेशी असल्यामुळे मराठीशी संपर्क कमी झाला. मायबोलीशी संबद्ध कायम रहावा म्हणून बरेच प्रयत्न करत असतो. आपल्या कविता वाचन त्यातलाच एक.असो.
      आपला
      गणेश हजारे

      ReplyDelete
    3. गंगाधरजी,
      आपले वाचन मी नेहमी वाचत असतो. आज तुमच्या बद्दल वाचुन नारायण सुर्वे आठवतात.
      ते म्हणाले होते ---- "भाकरीचा चंद्र शोधण्यात आर्धी जिंदगी बरबाद झाली"
      त्या वेळी या ओळींचा अर्थ कधी उमजला नाही. हा अर्थ कळायला हजारो दिवस गेले.
      "शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
      स्वप्नेच वांझ झाली, तारूण्य जाळतांना."
      ही वाक्ये लिहीताना किती जीव जळला असेल ते हा जीवच सांगू शकेल. व्वा.. छान, अप्रतीम म्हणयला किती वेळ लगतो हो... आणि आपल्या लिखाणाची तुलना अशा दोन चार शब्दात होऊ शकत नाही...
      तुम्ही आज जे काय लिहीताय ते फार छान आहे. तुमचे विशेष करून शेतक-यावरील लेख फार सुंदर असतात आणि तो एक शेतकरीच फार उत्तम त-हेने समजु शकेल.


      ReplyDelete
      Replies
      1. पंकजजी,
        प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

        http://gangadharmute.wordpress.com/
        http://www.baliraja.com

        या साईटला पण भेट द्यावी.
        यथावकाश सविस्तर बोलुयात. :)

        Delete

    माझे विचार
    आपणास आवडले तरी
    आणि नाही आवडले तरीही
    प्रतिक्रिया अवश्य द्या...
    आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.