Saturday, 10 July 2010

सत्ते तुझ्या चवीने

सत्ते तुझ्या चवीने 

सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले

सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले
लढतोय एकटाची, सारे पळून गेले

कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले

समजू नको मला तू विश्वासघातकी मी
पाऊल सरळ होते, रस्ते वळून गेले

आता इलाज नाही, नाहीत मलमपट्ट्या
मजला कळून आले, तुजला कळून गेले

वणव्यात कालच्या त्या, काही उडून गेले
काही बिळात घुसले, बाकी जळून गेले

का सांगतोस बाबा अभयास कर्मगाथा
द्रवलेत कोण येथे, कोण वितळून गेले?

                गंगाधर मुटे
.................................................

1 comment:

  1. खूप छान आहे तुमची कविता ....एकदम मार्मिक

    - नागेश

    ReplyDelete

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.