Wednesday, 22 September 2010

हिशेबाची माय मेली?

हिशेबाची माय मेली?

कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?

पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?

तिला घाबरावे असे काय आहे
अशी काय ती तोफ़ लागून गेली?

किती नाडती आडदांडे तराजू
कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?

कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी
कशी दरवळावीत चंपा चमेली?

म्हणाले 'अभय' 'ते' तुरुंगात डांबू
''जरी आमुची तूच तक्रार केली..!''


                   गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
(वृत्त - भुजंगप्रयात )

Sunday, 12 September 2010

गणपतीची आरती









गणपतीची आरती


जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्विकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तुच बाप,माय तुची, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

                               गंगाधर मुटे
................................................

Saturday, 11 September 2010

श्री गणराया









श्री गणराया


कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥

चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
व्दारी उभा मी नाम स्मराया ॥१॥

भवमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥

अनुष्ठान हे तव पुजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥

                        गंगाधर मुटे
..........................................

Wednesday, 8 September 2010

अट्टल चोरटा मी........!!

अट्टल चोरटा मी........!!

नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना
कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो
ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो
आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्यासाठी
मी चोरी करून जातो .....!!

जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द
कुणीतरी सहज बोलून जातो
अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो
आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्यासाठी
मी चोरी करून जातो .....!!

ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात
नजर स्थिर होवून मन डोलायला लागते
कुणीतरी मधूर तरंग हवेवर पेरून जातो
आणि ती नादब्रह्माची लय चोरण्यासाठी
मी चोरी करून जातो .....!!

वार्‍यापासून बळ चोरतो, सुर्यापासून आग
ढगापासून छाया चोरतो, संतांपासून राग
चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी
सद्‍गुणांची उचलेगिरी अंतराच्या शुद्धीसाठी
असा अभय भामटा मी
असा अट्टल चोरटा मी.......!!

                                गंगाधर मुटे
.......................................................