Sunday 30 May, 2010

दोन मूठ राख


दोन मूठ राख
अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं... म्हणालं
"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"
अस्तित्व हसलं...... म्हणालं
"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय.
माझ्याशी दोन हात करण्यापुर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वत:चं अस्तित्व तयार कर...
आणि अभयपणे एक लक्षात घे
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी नक्कीच उरणार....!"
गंगाधर मुटे
....................................................

Saturday 29 May, 2010

घुटमळते मन अधांतरी

घुटमळते मन अधांतरी

अधांतरी घुटमळण्यामध्ये जन्म उरकला सारा
खूप उभारी उडण्याची पण असुया धरतो वारा

पुसतो सदा आसवांना तो पदर भूमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो "आली जाग शिवारा?"

रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो
पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?

मोरपिसाचे रंग लेवुनी, ढगांस तू उधळावे
ढगाळुनी या काळजासही यावा भावपिसारा

शब्दामध्ये परके शब्द बेमालूम ते घुसती
मायबोलीच्या सुंदरतेला काळिमा तो सारा

कालपरत्वे अनहित बुद्धी, तोल तरी ना जावा
मानवतेचा पाठपुरावा ’’अभये" अंगीकारा

गंगाधर मुटे

..................................................

Thursday 27 May, 2010

खाया उठली महागाई : नागपुरी तडका

खाया उठली महागाई : नागपुरी तडका

नाकी तोंडी पाणी घुसले, जीव झकोले खाई
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

आवतन नव्हते दिले तरी, वाजत-गाजत आली
एक तारखेस खिसा भरला, पाच तारखेस खाली
देवदर्शन दुर्लभ झाले, आता पायी पंढरीवारी
गहाळ झाल्या सोई-सुविधा, परी कर वाढतो भारी
धान्यामधी खडे मिसळती, शासक टूकटूक पाही
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

तेलामध्ये भेसळ होते, मिरची मध्ये गेरू
पाचक रसा दुर्बल करते, व्याधी पाहाते घेरू
दवादारू महाग झाली,आतून काळीज पिरडी
गरिबाघरी कँसर आला, बांधून ठेवा तिरडी
मुक्ती मागे रोगी सत्वर,अन यमास नसते घाई
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

नाही आवर महागाईला, मग कशास शासनकर्ते?
इच्छाशक्ती मरून जाता, औचित्य काय ते उरते?
लाल दिव्याचा हव्यास केवळ, केवळ सत्तापिपासा
घाऊकतेने भरडून खाती, हीन-दीनांच्या आशा
आमजनांना "अभय" दाता, ’विचार’ उरला नाही
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

गंगाधर मुटे
---------------------------------------------------
ढोबळमानाने शब्दार्थ.
झकोले = हेलकावे
आवतन = आमंत्रण
पिरडी = पिरडणे = पिरगाळणे
---------------------------------------------------

Wednesday 26 May, 2010

पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली

(कविश्रेष्ट सुरेश भटांची माफी मागुन ...एक पहाट अशीही…..)

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली…….!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालु कानी, बोळे ते कळेना
असा राहुदे हात, माझ्या कानाशी …!!

म्हणू घोरणे की, फुस्कारने याला
कर्कश बेसुरांची,जणू पुष्पमाला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली …!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी,ऑलाउट कशाला ?
फुकटात सारी, मच्छरे पळाली …!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
झोपही अताशा, चकनाचूर झाली …!!

*********************************
त्या सर्व पिडाग्रस्त सहचार्‍यांना समर्पित.
*********************************

Tuesday 25 May, 2010

मांसाहार जिंदाबाद ...!!

मांसाहार जिंदाबाद ...!!

सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन गांडूळाच्या शेवया...!!

गोचीडाची खिचडी
टमगिर्‍याचं भरीतं
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीतं
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकून
घे पुरणात भराया .....!!

गोमाश्याचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
ऊंवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!

कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जीभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरीबाला सूळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!

गंगाधर मुटे
............................................
ही कविता प्रकाशीत करतांना मला खुप मानसिक त्रास झालाच.
आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.

मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?

या कवितेत "शाकाहार की मांसाहार" हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.
अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हे महत्वाचे.
..............................................

Monday 24 May, 2010

भक्तीविभोर....!!

भक्तीविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला

आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला

आता दह्यादुधाला कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

प्रेमात वारसांच्या स्वहिता भुलून गेला
नात्यास भार होता स्वजनात चोर झाला

यावे तसेच जावे ना 'अभय'दान कोणा
मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला

गंगाधर मुटे

Sunday 23 May, 2010

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका

औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली
आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ......॥१॥

हे ऊन व्हंय कां कां व्हंय, काही समजत नाही
पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही
पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला
पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला
इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ......॥२॥

बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते
लोडशेडींग पायी बाप्पा, नाकात नव आले
कुलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले
उष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ......॥३॥

नदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली
पाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली
नळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते
विहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते
दुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ......॥४॥

पशू-पक्षी अभय नाही, निवारा ना थारा
मागून-पुढून मस्त देते, चटके गरम वारा
दैवाचे फ़टके सोसून, आयाबाया झाल्या धीट
घागरभर पाण्यासाठी, अर्धा कोस पायपीट
नशिबाले जगरूढी, चिपकूनच गेली ......॥५॥

गंगाधर मुटे
.........................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ.
जम्मून = जोराने,झपाट्याने.
झावा = गरम हवेचे तडाखे.
.........................................................

Saturday 22 May, 2010

कथा एका आत्मबोधाची...!!

कथा एका आत्मबोधाची...!!

तो सर्प...! जन्मत: बिनविषारी होता
फ़ूत्कारणे त्याच्या गावी नव्हते
आचरण त्याचे सरळमार्गी.... कुणाला न दुखावणारे
तेंव्हा त्याच्यावर सगळे..... तुटून पडायचेत
कोल्हे-लांडगे खेकसायचेत... मुंग्या-माकोडे चावायचेत
अज्ञान-सज्ञान, सभ्य-असभ्य, शिक्षित-अशिक्षित
सुसंस्कृत-सुसंस्कारी ........ झाडून सगळीच
त्याला खडे मारारायचीत
तो रडायचा....... केविलवाणी अश्रू ढाळायचा
कळवळायचा... असह्य वेदनांनी... कण्हायचा
पण दुसऱ्याच्या वेदनांवर पाझरेल... तर ती जगरूढी कसली?
मग तो स्वबचावासाठी जीव मुठीत घेवून पळायचा.....
आणि तरीही.....
पाठलाग करणारी पिच्छा पुरवायची....
खिदळत..... दात वेंगाडत...!
आणि मग एक दिवस........ एका निवांत क्षणी
त्याला आत्मबोध झाला.........!!
विचाराला कलाटणी मिळाली...कळले की
आक्रमणाला उत्तर बचाव नसते...
तलवारीला उत्तर ढाल नसते....
'अहिंसे'चे अर्थ भेकडपणात नसते.
"आक्रमणाला आक्रमणानेच" आणि "तलवारीला तलवारीनेच"
उत्तर द्यायचे असते....!!!
आणि मग....... आणि मग त्याने.....
त्याने श्वास रोखला..... सगळे बळ एकवटून.....
असा काही फ़ुत्कार सोडला की...........!!!!
आता......
कोल्हे-लांडगे कान पाडून पळत होती,
कुत्रे शेपट्या खाली करून पळत होती,
आणि माणसे.... माणसे जीव मुठीत घेवून....
जीवाच्या आकांताने सैरावरा पळत होती...!!!!
कारण.........कालचा बिनविषारी साप
अभयाने आजचा....
.........जहाल विखारी नाग बनला होता.......!!!!!

गंगाधर मुटे

Friday 21 May, 2010

कान फ़ळलेच नाही

कान फ़ळलेच नाही

उपदेशाने कान कसे फ़ळलेच नाही
माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही

निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने
पानगळीतही मग पान गळलेच नाही.

वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो
तेंव्हापासून व्यथांनी छळलेच नाही

चिरंतन असती बोल संत साहित्याचे
अनीतीच्या शेकोटीत जळलेच नाही

श्रावणात घननिळे जरा पिघळले होते
पुन्हा त्यांचे थेंब कसे वळलेच नाही

जनसेवेचा प्रताप आणि “अभय” पुरेसे (?)
शुभ्रकापड घाणीतही मळलेच नाही

गंगाधर मुटे

Thursday 20 May, 2010

कुटिलतेचा जन्म.......!!

कुटिलतेचा जन्म.......!!

मत्सराची ज्योत जेथे शीलगाया लागली
नेमकी तेथे कुटिलता जन्म घ्याया लागली

जळफ़ळ्या वृत्तीवर दवा,औषध तरी कोठले?
आमरस्त्यावरच कांटे पसरवाया लागली

कालपावेतो भुतावळ मी म्हणत होतो तिला
चेटकी होऊन आता ती फ़िराया लागली

वरणभात जुनाट झाला वेगळे खावे म्हणे
कुंठलेली नीतिमत्ता शेण खाया लागली

थांबवा फ़ाजील चेष्टा बांडगूळांनो अता
वेदना सोसून काने, छी:! पिकाया लागली

ह्या खडूसांची खुशामत "अभय" केली ना कधी
सावजासम घेरती मज डाफ़राया लागली

गंगाधर मुटे
....................................................
वृत्त - देवप्रिया ( गालगागा ) ३ + गालगा
....................................................

Wednesday 19 May, 2010

वाघास दात नाही

वाघास दात नाही

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

..... गंगाधर मुटे ...

........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................

Tuesday 18 May, 2010

हताश औदुंबर

हताश औदुंबर
(बालकवींचा क्षमाप्रार्थी)

ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेवून
निळा पांढरा थवा चालला, रजकण पांघरून
ढोल-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेवून
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करीतो, हताश औदुंबर

गंगाधर मुटे
.....................................................
("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)
.....................................................

Sunday 16 May, 2010

हव्या कशाला मग सलवारी ?

हव्या कशाला मग सलवारी ?

भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ?

नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढिगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ....!

टकमक बघुद्या बघणार्‍यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेवुद्या घेणार्‍यांना
सुखवू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
नव्या युगाची मी नारी ...!

स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
अभय वापरा घरोघरी ...!

................................

Saturday 15 May, 2010

तू तसा - मी असा

तू तसा - मी असा

नाकीतोंडी माश्या गेल्यात, मी मात्र मख्ख
माझी अवस्था पाहून, तू खिदळलास चक्क.

मोगल आले तेंव्हा, मी अगदी स्वस्थ
लाळ घोटायचा खुलेआम, तू मात्र मस्त.

इंग्रज आले तेंव्हा, मी झोपलो गाढ
चापलुशित तुझ्या, बरीच झाली वाढ.

डोंगरमाथ्याहुन शिवाजी, घालत होता साद
मला फ़ुरसत नव्हती, तुला फ़ितुरीचा नाद.

फ़ाशी चढतांना भगतसिंग, स्वप्न पाहात होता
मला प्रपंचाची ओढ, तू टाळ्या वाजवित होता.

आता उजाडेल,मग उजाडेल
"अभय" कधीतरी उजाडेल?
की.....
तू तसा-मी असा,
म्हणुन उजाडनेही बुजाडेल?

                   गंगाधर मुटे

Friday 14 May, 2010

नंदनवन फ़ुलले ...!!


नंदनवन फ़ुलले ...!!

वृद्धतरूच्या पारावरती,
झोके घेत झुलले
तरूघरी नंदनवन फ़ुलले ...धृ..

रम्यकोवळी रविकिरणे ती
कुणी अप्सरा खिदळत होती
मेघही हसती उडता उडता
गरजणे भुलले.... ..१..

भूक कोवळी घेवून पाठी
स्वप्न उद्याचे कुणी शोधिती
भिरभिर भिरभिर उडती पतंगे
पंखही खुलले.... ..२..

पक्षी बोलती खोप्यामधुनी
मधमाशांशी हितगुज करूनी
वल्ली नाचल्या धुंद होऊनी
पैजन थरथरले... ..३..

गाय,खार अन मनीम्याऊ ती
खेळ खेळती लपती छपती
चित्रकार तो तदृप झाला
रंगही स्फ़ुरले.... ..४..

चैतन्याचे "अभय" तरंग
वृद्ध तरूही झाला दंग
खोडव्याला फ़ुटली पालवी
फ़ूले ही फ़ुलले.... ..५..

         गंगाधर मुटे

Thursday 13 May, 2010

आभास मीलनाचा..

आभास मीलनाचा..
(वृत्त - आनंदकंद)

केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला

शून्यात पाहतांना हळुवार लाजली ती
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला

तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला

पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची?
येता थवे निवासा, मग मेळ खास झाला

विरहात वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास झाला

प्रेमा सदा भुकेली अभये सजीव माया
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला

              गंगाधर मुटे

Wednesday 12 May, 2010

प्राक्तन फ़िदाच झाले


प्राक्तन फ़िदाच झाले
प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना
द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना
आता "अभय" जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी  निघावे ही वाट चालताना
गंगाधर मुटे "अभय"
...............................................

Tuesday 11 May, 2010

सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत


सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत
लख्खलख्ख लख्खलख्ख, तुंबडी का गाना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ...!!

सांगतो मी एक बात, इकडं तुमी फ़िरा
आमच्यापाशी एक हाय, सचिन जैसा हिरा
भारला त्याने देश पुरा, जग येडेपिसे
शेनवार्नला स्वप्नामंधी, चौके-छक्के दिसे
कान द्या इकडं जरा, ऐकून तुम्ही घेना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ...!!
दिसायला म्हणान तर, छोटी मुर्ती हाये
क्रिकेटचं सारं जग, त्येचा खौफ़ खाये
शतकांची गणती नाय, किती चौके-छक्के
अचंबित दुनियासारी, सारे हक्के-बक्के
देव्हार्‍यात पूजा त्याची,खांदी घ्यावा मेणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ...!!
कधी ना खचला हिंमत, त्याचे नांव सचिन
माणुस व्हय का देव ह्यो, कांप्युटरी मशिन?
खेळापुढे कधी त्याने, मोजला नाही पैसा
भगवंताने द्यावा पुत्र, घरोघरी ऐसा
समद्यायच्या तोंडी नांव, सच्चिन-सच्चिन येना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ...!!
उत्तरेचा हिमालय, दक्षिणेचा सागर
सच्चिनच सारं जणू, अमृताची घागर
जिथं झडे पायधूळ, बॅट याची धडके
तिथं-तिथं तिरंगा, गौरवाने फ़डके
मानु नका नुस्ता देव,थोडी अभय कला घ्याना
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देना ...!!
गंगाधर मुटे
...................................................
तुंबडी = एक भोपळा असलेले तंतुवाद्य / भिक्षापात्र.
...................................................

Sunday 9 May, 2010

माय मराठीचे श्लोक...!!


माय मराठीचे श्लोक...!!
       ( वृत्त - भुजंगप्रयात )
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रम्हांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
"अभय" एक निश्चय मनासी करावा
ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
गंगाघर मुटे "अभय"
..................................................

Saturday 8 May, 2010

चापलूस चमचा : नागपुरी तडका

चापलूस चमचा : नागपुरी तडका

हलक्या-पतल्याचा जमाना, राह्यलाच नाही
श्याम्यासारखा इब्लिस, म्या पाह्यलाच नाही...

पोम्याले म्हणे तुनं, शरम काहून विकली
मिशी पकून गेली तरी, अक्कल नाही पिकली
मुकरदमच्या चपला, चक्क डोक्यावर घेते
एवढा कसा लाचार, त्यायचे धोतरं धूते
असा चापलूस चमचा, म्हणे झालाच नाही ...

चारचौघात गेला तं, अक्कल तारे तोडते
शोकसभेत बोलंण तं, जम्मून भाषण झोडते
असे गुण गावते, जे मयतात असण-नसण
याचं भाषण आयकून, थो मुर्दा हासत असण
देवळामंधी हार कधी, वाह्यलाच नाही....

थेटरमंधी जाईन तं, सुदा नाय बसणार
समोरची खुर्ची भेदून, याची तंगडी घुसणार
तमाशातल्या बाईवर, नोटा-बंडल लुटते
दमडीसाठी भिकार्‍याले, अक्कल सांगत सुटते
जिंदगीचा डाव "अभय", हारलाच नाही ...

                        गंगाधर मुटे
..........................................................

Friday 7 May, 2010

धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका


धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका
धकव रं श्यामराव झोल नको खावू
नशीबाची गाथा नको कोणापाशी गावू....!
रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा
कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला
उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला
दोघाचबी गर्‍हाणं सारखच हाय भाऊ ...!
मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्‍हे
खरीददार म्हणे ह्या गहू होय का जिरे?
आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही
घेवून जा वापस नायतर धडगत नाही
नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हावू?....!
पदवीची पुंगी घेवून पोरगं वणवण फ़िरते
डोनेशनबिगर कुठं नोकरीपाणी मिळते?
चपराशाचा भाव सध्या सात लाख सांगते
मास्तरसाठी अभयानं बारा लाख मांगते
"नोकरीले मार गोली" म्हणलं खेतीवाडीच पाहू....!
गंगाधर मुटे
......................................................
ढोबळमानाने शब्दार्थ.
झोल खाणे = कच खाणे.माघार घेणे.
उंबई = ओंबी, गिर्‍हे = ग्रह
......................................................

Sunday 2 May, 2010

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरूपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

गंगाधर मुटे

…………………………………………..
ही रचना गेय असल्याने समर्पक
चाल योजुन सहज गाता येईल.
…………………………………………..

कविता म्हणू प्रियेला

कविता म्हणू प्रियेला

कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी?
'' साहित्यचोर न टपो '' या काळजीत मी

अपराध काय माझा ते तूच सांगना
लेखी तुझ्या उरावा माझा अतीत मी

अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता
जगणे अवखळ माझे अन टवटवीत मी

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

अभयास अभ्रकाचे छप्पर नसे जरी
नक्षत्र पांघरूनी या झोपडीत मी

गंगाधर मुटे
..................................................
वृत्त - 'विद्युलता'
गागाल गालगागा, गागाल गालगा
.................................................

Saturday 1 May, 2010

लकस-फ़कस : नागपुरी तडका

लकस-फ़कस : नागपुरी तडका

काहून बाप्पा रंगराव, लकस-फ़कस चालता
खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालता....!!

’सहकारात’ होते तेंव्हा, काय तोरा व्हता
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया
पद गेल्याच्यानं आता, गोमाश्या हाकलता....!!

म्हणा काही रंगराव, गणित तुमचं चुकलं
विरोधात बसले म्हून, खिसे भरणं हुकलं
बाकीच्यायनं थातुरमातूर, टोपीपालट केली
दोन पिढ्या बघा कशी, गरीबी हटून गेली
पब्लीकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ....!!

होय-नोय उठ-सूठ, विमान वार्‍या करता
खुर्चीच्या लोभापायी, दिल्लीत पाणी भरता
जनतेचे प्रश्न जरा, "अभय"पणे मांडा
मनका टाईट ठेवूनशान, खमठोकपणे भांडा
हायकमांडच्या गुरकावणीले थरथर हालता ...!!

.....गंगाधर मुटे..
................................................................
ढोबळमानाने शब्दार्थ:
लकस-फ़कस = बेडौल
मांजरपाठ = स्वस्त व जाड धोतर
................................................................