Saturday 24 April, 2010

हे रान निर्भय अता....


हे रान निर्भय अता....
हे रान निर्भय अता,वाघास दात नाही
त्या बोळक्या मुखाने,काहीच खात नाही
नुसत्याच थयथयाटी, कल्लोळ हो सुरांचा
झंकारणे सुरानी, त्या घुंगरात नाही
वणव्यात त्या तरुंचे, अर्धांग भस्म झाले
तेही वसंत वेडे ऋतु, गीत गात नाही
लादू नये अपेक्षा भरपूर पालकांनी
आनंदही अताशा, त्या शैशवात नाही
बाणा कसा जपावा,लवचीक जो कणा ना
अभिमान "मी मराठी" मुळचा घरात नाही
चौफेर वेढलो मी, फासेच मांडती ते
समरांगणा भिणारी,माझी जमात नाही
छळले मला कितीही, लखलाभ हो तयांना
अभयात नांदतो मी, किल्मिष मनात नाही
.
.............. गंगाधर मुटे.
........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................

चंद्रवदना ...

चंद्रवदना ...

मृदगंध पसरला, घुमली शीळ लाघवी ती
पळते खिदळत सर की, चंद्रवदना नवी ती?

रुतले सदैव काटे, गजर्‍यास गुंफताना
ती कमनशीब पुष्पे, वेणीस लाजवीती.

कित्येकदा झर्‍यांना, लाटा गिळून घेती
घेणार जन्म तेथे, कल्लोळ,यादवी ती.

बोलायचे तुला जे, ते बोल निश्चयाने
शंका कदाचित तुझी, असणार वाजवी ती.

छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती.

..... गंगाधर मुटे ..

........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................

Thursday 22 April, 2010

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका


श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥

जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे

.....................................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकूल = पुर्णपणे.
....................................................................
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
...................................................................


.......................................................................

Sunday 18 April, 2010

पुढे चला रे...

पुढे चला रे....

चेतलेल्या तेलवाती शांत नाही
चालतांना वाट ही विश्रांत नाही.

नेमलेले लक्ष्य आवाक्यात आहे
ना तमा वा सावजाची भ्रांत नाही.

वेदनांची पायमल्ली फार झाली
झुंज शौर्याने अर्जी आकांत नाही.

आजमावुन एकदा घे तू लढाई
सोक्षमोक्षाविन अता मध्यांत नाही.

घे भरूनी पोतडी दोन्ही कराने
हा विरक्ती साधकांचा प्रांत नाही.

.गंगाधर मुटे.
...........................................
वृत्त - गालगागा X 3
...........................................

Saturday 17 April, 2010

नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

कायरं श्याम्या इथंतिथं झ्यामल-झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

ईचीबैन हे गजकरण भलतच भारी असते
चहाड्या-चुगल्या केल्याबिना पोट भरत नसते
अफवा पेरासाठी लोकायचे कानफट पाजवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

याची टोपी त्याच डोस्क, काट्याने काटा काढतोस
साथ देईन त्यालेच तु, तोंडबुचक्या पाडतोस
सिध्यासाध्या असामीले, बोटावर नाचवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

समोरच्या तंगडीमध्ये, आडवी तंगडी घालतोस
त्याले उबडं पाडूनशान, त्याच्या म्होरं चालतोस
समद्यायले झाशा देवुन, अभये  भाकरी भाजतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

..गंगाधर मुटे..

( नागपुर आणि आसपासच्या काही जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा एक आगळी बोलीभाषा आहे. ही भाषा वर्‍हाडी,झाडी मध्ये पण मोडत नाही. त्यामुळे या प्रकाराला 'नागपुरी तडका' हे नांव शोभुन दिसेल असे वाटते.)
.....................................................................
मोंढा = पाठीचा खांद्यालगतचा भाग.
इतर शब्दांचे अर्थ समजुन घ्यायला कठीन नाहीत.
.....................................................................

ता.क- कवितेत जरी "मोंढा" हा शब्द असला तरी त्याऐवजी कवितेचा भावार्थ अधिक परिणामकारक करण्याच्या हेतुने कविता वाचतांना किंवा गातांना मोंढ्याऐवजी दुसरा पर्यायी शब्द-ज्याला जो आवडेल तो- वापरायला काहीही हरकत नाही.

नाते ऋणानुबंधाचे....!!


नाते ऋणानुबंधाचे..

ऋणानुबंधाचे...... ते हक्क सांगताना
पुलकित होय अवनी, ओहळ रांगताना...!

का उठती रोमांच? अलगद स्पर्श होता
ते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ....!

गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणे
शहारते पाकळी, पतंग खेळताना ......!

अस्पर्श रक्षिलेला, जपुन जतन ठेवा
ते हृदयही कंपित, तार छेडतांना ......!

स्पर्श उत्कटतेचे, सख्यास बळ देते
तन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना...!

फेकुनी दूर अभये, शाल काळोखाची
रजनी लेत लाली, भानू उगवताना...!

..गंगाधर मुटे

Friday 16 April, 2010

हे गणराज्य की धनराज्य?

हे गणराज्य की धनराज्य?

प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!

एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगुलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदान्ध उन्मत्तशाही...!!

डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवित नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!

विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवण भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालकं मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडूंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला आटोका ना, सुस्त झाली दंडशाही...!!

गंगाधर मुटे
---------------------------------------------------
काही शब्दांचे मोघम अर्थ
प्रजापती,सुलतान,नृप = राजा
प्रगल्भ = परिपक्व
लांगुलचालन = खुशामत
मदांध = माजलेले
धनमत्ता = मालमत्ता
उद्दाम = बेफाम
सुगी = समृद्धी
पोटपाणी = उदरनिर्वाहाची साधने.
यौवण = तारुण्य.
-----------------------------------------------------

Thursday 15 April, 2010

हवी कशाला मग तलवार ?

हवी कशाला मग तलवार ?

मकरंदाहुनि मधुर तरीही
शर शब्दांचे धारदार
तळपत असता जिव्हा करारी
हवी कशाला मग तलवार ?......!!

शब्दच असती कवच कुंडले
शब्दच चिलखत होती
शब्दच होती आयुधे ऐसी
नभास भेदुनि जाती
शब्द खड्ग अन शब्द ढालही
परतवती ते हर वार.......!!

नवनीताहुन मऊ मुलायम
कधि कणखर वज्रे
आसवांनी भिजती पापण्या
कधि खळखळ हसरे
हीनदिनांचे सांत्वन करिती
गाजविती दरबार....!!

भुंग्यासम शब्दांची गुणगुण
कधि व्याघ्राची डरकाळी
शब्द फटाके,शब्द फुलझडी
कधि नीरवता पाळी
जोशालागी साथ निरंतर
कधि विद्रोही फूत्कार ....!!

सृजनशीलता-करुणा-ममता
संयम विभूषित वस्त्रे
हजरजबाबी, तलम,मधाळहि
परि कधि निर्भिड अस्त्रे
पांग फेडण्या भूचे अभये
तळहातावर शिर शतवार ...!!

गंगाधर मुटे

Wednesday 14 April, 2010

नशा स्वदेशीची...!!

नशा स्वदेशीची...!!

आज रात्रीच्या मध्यात असे काय घडणार आहे?
जुन्याचा खातमा होऊन नव्याची स्थापना होणार आहे?
की व्यवस्थेचे शेंडाबूड परिवर्तन होणार आहे?
निराशेला बुडवून आशेला कोंब येणार आहे?
की उमेदीला भविष्य खांद्यावर घेणार आहे?
नेमके होणार तरी काय आहे?
फ़क्त हेच होणार की स्वप्नांचे मनोरे बांधले जाणार
आणि अवगुण गाळण्याचे संकल्प सोडले जाणार
मात्र अवगुण गळण्याऐवजी संकल्पच गळणार
तरीही आशा की... भविष्य उजळणार
अशा मंगल घटिकेला, चला एक एक ग्लास भरून घेवू
पळू नका गांधीप्रेमींनो, आज थोडासा विचार करून घेवू
ग्रामस्वराज,स्वदेशीचा अर्थ आज लागणार आहे
बदल्यात फक्त गावठीचा एक पेला मागणार आहे
इंग्रज गेल्यापासुन म्हणा अथवा
किल्ल्यावर तिरंगा फडकल्यापासून म्हणा
कुठेतरी,कधीतरी, उजेडात वा अंधारात
आढळल्यात त्या महात्म्याच्या पाऊलखूणा ?
हमरस्त्यावर बेदरकारपणे आणि अगदी एकमताने
त्या ग्रामसुराज्याच्या संकल्पनेला फासलाय ना चुना ?
पण इथे ग्रामोद्योगाचा मुलमंत्र साकारलेला दिसतो
मोहाफुलापासुन गावठीचा सुंदर प्रकल्प आकारलेला दिसतो
सरकारला सबसिडी इथे कोणीच मागत नसते
शिपाई,कलेक्टर,मंत्री सर्वांना नियमित हप्ते जात असते
ग्रामस्वराज्याची संकल्पना पचनी पडत नाही कारण
भगतसिंगासारखी नशा आता कुणालाच चढत नाही
खुर्चीच्या दलालांनी नारळ असं कसं फोडलं
नियतीने क्रित्येकांना गुत्त्यावर आणून सोडलं.
थोडी पोटात गेली आता अभयाने पडतोय  गिअर
पिल्या-बिनपिल्यांनाही मेनी मेनी हॅपी न्यू ईअर....................!!!!

गंगाधर मुटे
(३१-१२-२००९)

.. रे नववर्षा


.. रे नववर्षा
रे नववर्षा ये नेमाने
वल्हवित अंकुर नवजोमाने
एक कवडसा चैतन्याचा
जा फुलवीत ही उदास राने ....!
ना अस्त्राने वा शस्त्राने
उकलन व्हावी सद्भभावाने
मत्सर-हेका ना गर्जन-केका
बाहुबलीचे नको भूजाने .....!
दानवाने ना देवाने
राज्य करावे बळीराजाने
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!
रे नववर्षा दे अभयाने
दे भरुनी दुरडी भगोणे
वित्तपातल्या लक्तरांना
भरव मुक्तीचे चार दाणे ...!
.. गंगाधर मुटे
...................................................

Tuesday 13 April, 2010

.आईचं छप्पर.

.आईचं छप्पर.

कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण ...!

अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी ...!

हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा ...!

छप्पर उडल्या संसारात
ब्रम्हपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ....!

पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ....!

गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ....!

...गंगाधर मुटे..
.
( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)

Monday 12 April, 2010

विलाप लोकसंख्येचा ..

विलाप लोकसंख्येचा ..

लोकसंख्या म्हणाली कवितेला
तुझ्यात सदा शृंगार, मुसमुसून वाहातो
म्हणून माझ्या कायेचा, आकार वाढत जातो....!

रुसवा फुगवा तुझ्यातला, नकळत लाडीगोडी
पिंगा फुगड्या तुझ्यातल्या, शब्दसंधानी खोडी
ओथंबलेल्या शब्दामधुनी, प्रेमरस वाहातो
म्हणून माझ्या कायेचा, आकार वाढत जातो....!

माझी शिंगे मलाच भारी, भूकेत झाली वृद्धी
कपडालत्ता औषधपाणी, काम करेना बुद्धी
गहू डाळी आयातीला, खोर्‍याने पैसा जातो
म्हणून माझ्या संतापाचा, उद्रेक वाढत जातो....!

ओलांडून ये सनातन रेघा, शृंगारी रसपरिघाच्या
माळरानी त्या करविहार तू, अभये श्रमगळीतांच्या
पुसण्यास या ललाटरेषा, तुझ्यात तो पाहातो
म्हणून माझ्या करुणेचा, विलाप वाढत जातो....!

                            गंगाधर मुटे
............................................................

Sunday 11 April, 2010

औंदाचा पाऊस

     औंदाचा पाऊस 


सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी,
कोमात गेलं शिवार सारं, व्वारे पाऊसपाणी ......!!
उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत,
बी-बेनं खत-दवाई, बिटी आणली उधारीत,
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदिम केला पुरा,
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा,
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!
बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा,
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा,
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते,
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते,
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!
सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे,
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे,
विहिरित नाही पाझार, नयनी मात्र झरे,
किसाना परिस कईपट, चिमण्या-पाखरं बरे,
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी .....!!
, गंगाधर मुटे
..........**..............**............. **............

ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
.....................................................

Friday 9 April, 2010

माणूस

माणूस 

अरे माणूस माणूस
जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने
रोज पेटवितो चुल्हा ......!

अरे माणूस माणूस
जसा बक समाधिस्थ
मिष साधूचे घेवूनी
करी सावजाशी फस्त .....!

अरे माणूस माणूस
जसं सरड्याच अंग
वेळ तशी खेळे संधी
बदली चामडीचे रंग ......!

अरे माणूस माणूस
जसा श्वान पोळी खाया
झगडीतो आप्तीयांशी
नाही दया, नाही माया......!

अरे माणूस माणूस
जसा इंगळीचा चावं
एक बोल जिभलीचा
देई कलिजाला घावं ......!

अरे माणूस माणूस
जसा कुंभाराचा खरं
फुकामधी ओझे वाही
वर चाबुकाचा मारं ......!

अरे माणूस माणूस
कसं निसर्गाचं देणं?
गुण श्वापदाचे अभये
नाही मानवाचं लेणं ......!

.           गंगाधर मुटे

Thursday 8 April, 2010

शल्य एका कवीचे...

शल्य एका कवीचे...

तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनी
ओघवती,रसाळ,सोज्वळ त्याची काव्यवाणी ......!

कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरात
रसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हातं
आवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुले
हेलाविती तनू-मने, वृद्ध,तरुण,सानुले
शासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरी
समीक्षक म्हणती "असा न् होणे" कवी जन्मांतरी
प्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिता
प्रेमीयुगुले रंगून गाती, त्याच्या प्रणयकविता

परी हृदयी शल्य एकची, कायम ही छलना
जीवनी त्याच्या, बनुनी प्रेमिका, ना ये कुणी ललना

"लाख दिलांच्या गळीचा ताईत" मिरवे बिरुदावली
गळात त्याच्या अजुनी नव्हती, एक वारू गावली

सांजसकाळी,ऐन दुपारी, ठाके ना त्याचे चित्तं
खाण्यापिण्याशी मन लागेणा, एवढ्याची निमित्तं

जलात हलते पाय सोडूनी, गावी प्रेम गाणी
कधी येशील गे! रूपमोहिनी मम हृदयराणी
नित्य नेमाने असेच स्वप्नं, उघड्या डोळ्या पडे
दचकणे,नेत्र मिचकने, क्षणाक्षणाला घडे
वर्षामागुनी अशीच वर्षे, वर्षे उलटली बारा
अढळ,निश्चल,अचल राहिला,सोसुनी ऊन वारा
प्रेमराधना,त्याची अर्चना,आसमंता कळाली
प्रेम देवता प्रसन्न झाली, तपश्चर्या फळाली

एक दिवस टक लावूनी, होता क्षितिजाकडे
दूरवर दिसली, एक कामिनी, येत त्याच्याकडे

त्याचे हृदय हलले, अंतरंग फुलले, आली एक झुरझुरी
शहारले अंग, उठले तरंग, रसनाही थरथरली

पाहता अवखळ चंचला, जसा कनक कुंचला, काळीजा रुंतला, तीर आरंपार
वाहता खळखळ झरा, जशी भोवळ गरगरा, येतसे तरतरा, झुळूक थंडगार

मग त्याला खात्री पटली
आजवर जी स्वप्नी नटली
मनःचक्षू जीस्तव झटली
ती हीच स्वप्नीची ज्वाला, जिवलग मंदारबाला
हुरूप असा की आला, मग बोलीला गहीवरुनी
मग उठती स्फूर्ती तरंग
त्या अद्भुत प्रतिभेसंग
प्रकटती इंद्रछटांचे रंग
त्याच्या वाणीमधुनी

हे सुंदरी, मदन मंजिरी, कपोल अंजिरी, अधर अंगुरी, अति सुकुमार
चंचल नयना, मंजुळ मैना, कोकीळ गहिना, प्रीती ऐना, नासिका चिरंदारं
रूप साजिरे, मुख गोजिरे, लावण्यं लाजिरे, तारुण्य माजिरे, चालणे ठसकेबाज
जशी उमलली,चाफ्याची कली,झुलती रानवली,अल्लड सुकमली,मुसमुसता साज

देवे घडवली, मूर्त मढवली
साजे चढविली, सृष्टीच्या अमोल तारा
स्वप्न साकारा, आले आकारा
दे तू होकारा, होशील का अर्धांगी दारा?

रसभरी मस्केगीरी ऐकुनी, प्रिया ती हसली
जळात हलते पाय सोडूनी, पाषाणी बसली
मग हळूच वदली, अति मंद-मंद मृदुभाषी
जसे रुणझुण पैंजण की, गुणगुणती मधमाशी

तुम्ही घातले साकडे, बोलुनी बोल धाकडे
मनही आल्हादले गडे, पण बोलू कशी खोटी?

माझ्या रूपाचा रंग भिन्न, चिंता घोर चित्त विषन्न,
कसा व्हावा प्रेमरंग मान्य व्याकुळल्या पोटी?
गडे स्वीकारू कसा तवं प्रीतीचा वसा?
तन्मयतेने असा फुकाच्या शब्दे?
देवे घडविली मला, तसाच घडविला
बापू,माई आणिक भाऊ तान्हुला

सृष्टीचे अघटीत चक्र, बापूला आले अंधत्व
आई पांगळी, दिले नियतीने मला पालकत्व

प्रश्न तोलाचा, लाख मोलाचा, उदरभरनाचा,
घोट दुधाचा, ओंठ तान्ह्याचा,सवाल जीवनमरनाचा
घरी उपाशी बसली सारी, रस्त्याला टक लावूनी
मी म्हटले "येते तान्हुल्या, थोडा दूधभात घेवूनी"
पदरी नाही अडकू-खडकू, कसे आणावे दूध कुठूनी?
तुम्ही माझा वेळ दवडला, तुमच्या कविता ऐकवूनी
उत्तम आहे तुमच्या कविता, मनही मस्त रमले
पण पोटातील काहूर माझ्या, जराही न् शमले
'येत्ते मी आत्ता' म्हणुनी, गेली निघूनिया तरतरा
ठेवूनी त्याच्या हातावरती, बेरंगी मोतीतुरा

त्या मोतीतुर्‍याच्या अजुनी नाही, फुटल्या प्रेम लाह्या
शोधीत आहे, तो वेडा बापडा, अजुनी प्रेम छाया

अभय रसिकहो, तुम्हांस दिसली, कुठे ती नयन मोहिनी,
द्यावा निरोप तिजला, तो कविराजा, वाट पाहतोय अजुनी ......!

                                                   गंगाधर मुटे

Wednesday 7 April, 2010

घायाळ पाखरांस ...

घायाळ पाखरांस ...



का गळाले अवसान या करांचे ?
का भासते मलूल फडफडणे या परांचे ?
आल्या अवचित कुठूनी अनाहूत गारा ?
तुला लोळविले भेदुनी तुझा निवारा .....!

दृढ हिकमतीने तू घरटे बांधियेले,
अगम्य कला गुंफुनी अध्धर सांधियेले,
विसरुनी भूकघास, प्राण ओतलास,
वादळात क्षणाच्या झाले सारे खल्लास .....!

गठन-विघटन असे सृष्टीचक्र,
उर्वीही कंपविते होतां दृष्टीवक्र,
उन्मळती तरूही जलप्रलयाने,
रे त्रागा अनाठायी! वियोग आशयाने ......!

सावर विच्छिन्न परं, घायाळ काया,
हो सिद्ध, धरी जिद्द, फिरुनी श्रमाया,
बाधित वेदनांनी, जरी उरं धापे,
साधित काय होई, रुदन विलापे ? ......!


मेघ येती, विरती, पावती लयासी,
वारा, त्या गारा, अस्तल्या निश्चयासी,
न चिरंतन काही, क्षणभंगुर पसारा,
मग व्यर्थ का रे! शोक अंगीकारा ? ......!

रुदन, विलाप असे कायरत्व,
दान, आर्जव दुषित याचकत्व,
सज्ज हो झुंजण्या, करुनी चित्त खंबीर,
विपत्तीशी टक्करतो, तोच खरा वीरं .....!

अनुकंपा, याचना, पसरणे हात,
त्यास म्हणतात मनुजाची जात,
तुम्हा पाखरांची स्वावलंबी पक्षीजात,
स्वसामर्थ्याने करावी अरिष्टावर मात .......!

सरोज तेथे पंक, फ़ूल तेथे काटा,
अवघड दुर्गम्य, होतकरुंच्या वाटा,
पार करुनी जाणे, विपत्ती सावटांना,
अंती जय लाभे, हिकमती चिवटांना ......!

सरसर शर सुटावा, चाप ओढताची,
धक धक उरी धडकी, नाद ऐकताची,
तसे तुझे उडणे, कापीत नभांगणाला,
जणू शूर शोभे, रणांगणाला ......!

पाट पाण्याचे थिरकत तरंग,
वरी विह्नंगावा तोर्‍यात राजहंस,
तसा तुही विहर, घे कवेत दिशांना,
नव्हे धरा रे ! गगन तुझा बिछाना ......!

घे शोध स्वत्व, त्याग आत्मग्लानी,
वाली तुझा तूची, बळ अंगी बाणी,
लाली भोर ल्याली, सरली निशा काळी,
"धडपड" अभय किल्ली, भविष्या उजाळी ......!

घे एकदा भरारी मित्रा,
घे एकदा भरारी......!

.                    गंगाधर मुटे

शुभेच्छा

.... शुभेच्छा ...

तू हसलीस, खेटून बसलीस
प्रिये तुझे चालणेही झोकात
पण खरं सांगू .....
तुझ्या एका स्यांडलच्या किंमतीत,
माझे अख्खे ड्रेस होतात.....!

दोन दिलांचा प्रेमभाव
बरं असतं सांगायला अन् बोलायलाही
डोंगर दूर असला कि
सुंदर दिसतो पहायला अन् दाखवायलाही
पण एकदा तरी त्यांना
जाऊन विचार चढणार्‍यांना
दऱ्या-खोऱ्या, दगड अन् धोंडे
सुकून जातात पाण्यावाचून तोंडे,
उरात धाप लागते चढतांना
पाय तुटायला होतात उतरतांना
डोंगर तितका सुंदर नसतो
जितका लांबून दिसत असतो,

आणि तरीही तेथे ...
स्वच्छ उन्हं अन् मोकळी हवा
मस्त विहंगतो पाखरांचा थवा
मोर- लांडोर नाचतात,पिसारा फुलवतात
अलबेल्या वल्लरिंना,
झाडे झुडपे झोका झुलवतात

कारण ..........
त्यांच्यात असते एक शक्ती
पाषाणातून पाणी खेचण्याची युक्ती
तुझ्यात जर का असेल तसे बळ
तरच तू दमयंती अन् मी नळ
पण .......
चांदणे शिंपत जाणारी तुझी वाट
इथे ओघळतात नुसतेच घामाचे पाट
उगाच पसरू देऊ नको भावनांना पर
विवेकाला स्मर आणिक विचार कर

तदनंतर अभयाने .........
तू हा म्हण, ना म्हण, जशी तुझी इच्छा,
एरवी तुझ्या आयुष्याला, माझ्या शुभेच्छा .......!!

..                      गंगाधर मुटे

Tuesday 6 April, 2010

जरासे गार्‍हाणे

 जरासे गार्‍हाणे

कुठे नोंदावी गार्‍हाणे हत्तीने तुडवले तेंव्हा
वा-याने उडवले आणि पावसाने बडवले तेंव्हा ......!

आदर्शाच्या रेघा शिष्यांनीच पुसून टाकल्या
त्या महात्म्याला वारसाने रडवले तेंव्हा ......!

त्यागुनी रणांगणाला पळपुटे जे पळाली
त्यांच्या पराक्रमाला कनकाने मढवले तेंव्हा ......!

जीविताची राख ज्यांच्या सिंहासने घडवतांना
त्यांच्याच चामडीचे पायतणे चढवले तेंव्हा ......!

बसवुनी खांद्यावर अभयाने आधार दिला,
तोच हितशत्रू ! कारस्थाने दडवले तेंव्हा ......!

दि :- ३० जानेवारी २००६       गंगाधर मुटे

मनसुबे मुंगळ्यांची

    मनसुबे मुंगळ्यांची

मनसुबे मुंगळ्यांची, ऐरावत बांधण्याची
काजवेच बाप झाली, सूर्य चांदण्याची.......!

रक्ताळला तसाची, घाम जिरून गेला,
स्वप्नेच वांझ झाली, प्रारब्ध गोंदण्याची...!

डुलतात रानवल्ली, त्यांना फाम असे का ?
मक्ते कुणा मिळाली, मुळे खोदण्याची..... ?

बिलग पाडसारे,  तू तुझ्या कळपाला,
चुल्हे निखार व्याली, तुला रांधण्याची...!

त्यागुनी रणांगणाला, अभय जे पळाली,
गर्दी त्यांचीच झाली, शौर्य नोंदण्याची.....!

                     गंगाधर मुटे
                 दि- २३ फेब्रुवारी २००२

Monday 5 April, 2010

हक्कदार लाल किल्ल्याचे…!









हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे …||धृ||



लढले बापु-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोशाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्तसांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे …||1||



विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे …||2||



शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून द्यावा बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभुचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे …||3||



गंगाधर मुटे
.......................................

शेतकरी मर्दानी...!

शेतकरी मर्दानी...!

काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
मलाबी रस्त्यावर येऊ द्या की .......!

या सरकारला आलीया मस्ती
कसे चाकर मानेवर बसती
ही विलासी ऐद्यांची वस्ती
लावती घामाला किंमत सस्ती
त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......!

ही सान-सान शेतकरी पोरं
ह्यांच्या बाहूत महाबली जोरं
वाघा-छाव्यांची यांची ऊरं
घेती लढ्याची खांदी धुरं,
हातात रुमणं घेऊ द्या की रं ......!

हे फौलादी शेतकरी वीरं,
तळहातात यांचे शिरं,
लढायला होती म्होरं
मग येई सुखाची भोरं
धरणीचे पांग फेडू द्या की रं ......!

ही विक्राळ शेतकरी राणी
नाही गाणार रडकी गाणी
ही महामाया वीरांगनी
अभय गर्जेल शूर मर्दानी
उषेला बांग देऊ द्या की रं ......!

              गंगाधर मुटे
दि :- ५ डिसेंबर २००१

Sunday 4 April, 2010

चाहूल नवःउषेची



चाहूल नवःउषेची


तरुणाईला उधाण यावं, चैतन्याला लाटा
गजबजाव्या चहूदिशांनी, संघर्षाच्या वाटा
घ्या मशाली, व्यापुनी टाका, इंच-इंच अंबरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

गोर्‍यानीतीला झेलत नेले, लाभ पोसले कुणी?
झकास जगले खुशालचेंडू, रक्तपिपासू कृमी
लायसन्स-कोटा,परमिट-नोटा, फास मांडीला ज्यांनी
घाम लुटुनी औद्योगीकतेचा, पवाडा गायला त्यांनी
उनेसबसीडीचा हिशेब मांडा, बांधा कटकंबरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

नेत्यांच्या गाली, तस्करी लाली,अफसर भासे गुंडे
डावे-उजवे, भ्रष्टाचारी, राजरोस राजबिंडे
मंदिर-मस्जिद,कमंडल-मंडल,मनुष्य वाटला ज्यांनी
निळा-भगवा,लाल-हिरवा, व्यापार थाटला त्यांनी
घ्या फैलावर त्यांना आता, चढवा फाळ नांगरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

काळ:रात्रीला तुडवीत आली, नवःउषेची लाली
गळून पडती बंधन-पिंजरे, झुळूक मुक्तीची आली
फडफडकरपर मार भरारी, अदमास घे गगनाचा
नवी अंकुरे, नवी क्षितिजे,घे वेध उद्यांगनाचा
न्या दरवळत या गंध मातीचा, उंच-उंच अंबरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

दि- ७ एप्रिल 2002        गंगाधर मुटे
(प्रकाशित " शेतकरी संघटक ")

Saturday 3 April, 2010

नूतनवर्षास....


   * नूतनवर्षास....*




वढं करशील नूतनवर्षा, सुजनतेच्या उत्कर्षासाठी,
र मर्दन छल-क्रौयाचे, अधमतेला घाल लाठी....!

जात्यांधतेने ग्रासलेले, इथून-तिथून सारे जग,
नेमस्तांची सहनशक्ती, किती काळ धरणार तग....?

वाघा-सिंहांची श्वापदवृत्ती, माणसेच हिंस्त्रमार्गे भटकती,
रिपुंचे अवडंबर माजून, माणसेच रक्ताला चटकती...!

दोर काप परतीचे, दिशा दे रे तरुणाप्रती,
क्राश्रू ढाळणार्‍यांना, प्रेरणा-शक्ती दे झुंजण्याची....!

द्द झाली सोशिकतेची, तांडव करील का उमेश ?,
जागे होऊ दे निद्रीस्तांना, आता तरी येऊ दे त्वेष...!

सातळाला जाऊ दे, उद्वेग, द्वेष, क्रोधकरणी,
दोषमुक्त समाजरचनेची, तवकाळी होवो पायाभरणी...!

ववर्षा उमगू दे मानवता, घडू दे ऋणानुबंधाच्या गाठी,
कर मर्दन छल-क्रौयाचे, अधमतेला घाल लाठी....!!

                                     गंगाधर मुटे
( प्रकाशित " लोकमत " दि. ०१ जानेवारी २००२ )

Friday 2 April, 2010

शेतकरी गीत

* शेतकरी गीत *

ऊठं ऊठं शेतकरी बाळा, तोडरे पैंजणचाळा
भुमातेची साद तुला, रानगंध लेवी भाळा
उचलुनी देख फ़णा, मना... शोध रे कारणा ......!

ताई-दादा राबताती, पिकतातं माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
तुझा बाप घाम गाळी, फुलोरते धरणी काळी
कोण करी सदावर्ते? चिंध्या कारे त्याच्या भाळी?
शोध हा तू न्यायपणा, मना... शोध रे कारणा ......!

तुझा बाप सांब भोळा, कष्टकरी मराठमोळा
घामदाम गिळण्यासाठी, घारी-गिद्ध होती गोळा
दूध-दही कोण प्याले? तुझ्या ताटी ताक आले
चातुर्याला हिरेमोती, श्रम मातीमोल झाले
ठेवुनिया ताठ कणा, मना... शोध रे कारणा ......!

आई करी शेण-गोठी, भात गहू भरती कोठी
दुरडीला सांजी नाही, झोपी जाते अर्धपोटी
भुईवरी घाम सांडी, कापुसबोंड कांडोकांडी
मलमली कोण ल्याले? तिची उघडीच मांडी
समजुनी घे धोरणा, मना... शोध रे कारणा ......!

कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?
काळी आई का बंधना? मना... अभय दे कारणा ......!

                            गंगाधर मुटे
...........................................................

ढोबळमानाने शब्दार्थ-
ओंब्या-कणसं = गव्हाची ओंबी,ज्वारीचे कणीस
दुरडी = भाकरी ठेवायची बांबुपासून बनविलेली टोपली
सांजी = समृद्धी = बरकत (किंवा शीग = धान्याचे
माप भरून त्यावर येणारी निमुळती रास)
...........................................................

मावळलेल्या वर्षास

.. मावळलेल्या वर्षास ...

उचल खाल्ली हैवानांनी,
सुजन झाले टाईट,
२००१ साला तुला टाटा,
बाय-बाय, गुड नाईट .....!

जाणार्‍याबद्दल बोलावं वाईट,
नाही आमच्याकडे प्रथा,
पण विसरता विसरत नाहीरे,
तुझ्या कारकीर्दीच्या व्यथा ....!

सव्वीस दिवसाचा बाळ तू ,
नसतील सुकले दुधाचे ओंठ,
हादरून टाकलास गुजरात,
फाटले धरणीचे पोट ...!

हत्त्या,ठार,हल्ला,बॉम्बस्फोट,
झाले तुझ्या परवलीचे शब्द,
अमानुषतेणे केला कहर,
महाशक्तीही झाली निरुत्तर ....!

पगार नाही,बोनस नाही,
उदिमांची गिर्‍हाईकी नेली,
कापुसवाल्या हलधरांची,
दिवाळीच अंधारात गेली ....!

घेऊन गेला इंद्रजीत,
देवीलाल,डाकुरानी फुला,
माधवरावांना हात लावतांना,
काहीच नाही वाटलं तुला ?...!

किमान अबाधित असुदे रे,
माणुसकी जगण्याचे राईट,
२००१ साला तुला टाटा,
बाय-बाय, गुड नाईट .....!!

..                गंगाधर मुटे
.. ( प्रकाशित लोकसत्ता ४ जानेवारी २००२ )

Thursday 1 April, 2010

श्रीगणेशा..!!

श्रीगणेशा..!!


नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा जिवलगा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू ,स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

  (मात्रावृत्त)                     गंगाधर मुटे
……………………………………