कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?
तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?
जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?
कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?
कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?
शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?
"अभय" काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन् वसावे कसे..!
.
.
गंगाधर मुटे
..................................................................................
(वृत्त - सुमंदारमाला)
..................................................................................
काही शेती संबधीत शब्दांचे ढोबळमानाने अर्थ.
खुरटणे = वाढ खुंटणे,
तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत
ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे
////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
No comments:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.