Sunday, 15 August 2010

गगनांबरी तिरंगा ....!!



   गगनावरी तिरंगा ....!!

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!


तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!


                             गंगाधर मुटे
.................................................

(वृत्‍त : आनंदकंद)
.........**.............**.........**......

No comments:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.