Sunday, 29 August 2010

हे खेळ संचिताचे .....!

 हे खेळ संचिताचे .....!


काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला

सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला

तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला

पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
झुंजतांना एकला मी, श्वासही सुस्तावला

साठले कंठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती
चालता मी "अभय" रस्ता, काळही भारावला

गंगाधर मुटे
......................................................
(वृत्‍त- देवप्रिया)
......................................................

Tuesday, 24 August 2010

फ़ुलझडी..........!!!!

फ़ुलझडी..........!!!!

तो....
चार शिष्य,चार चेले, चार चमचे
मागेपुढे चालायला, उदोउदो करायला
कायम आपल्या दावणीला बांधून
स्वत:च स्वत:विषयी लिहिलेले पोवाडे
गाऊन घेतो त्यांचेकडून
आणि  एवढ्या शिदोरीच्या बळावर
वाढवू पाहतो.... आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा......!!

ते....
ते भक्तही तल्लीन होतात
लोळवून घेत स्वत:ला त्याच्या चरणावर
वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा
मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत... होतात बेभान
जणुकाही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ
अशी स्वत:चीच मनसमजावणी करत... सदासर्वकाळ....!!

क्षणिक का होईना पण
चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी..........!!!!
.
.                                             गंगाधर मुटे
...........................................................................

Wednesday, 18 August 2010

स्मशानात जागा हवी तेवढी

स्मशानात जागा हवी तेवढी


कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?


जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

"अभय" काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

.
.
                                                      गंगाधर मुटे
..................................................................................
(वृत्‍त - सुमंदारमाला)

..................................................................................

काही शेती संबधीत शब्दांचे ढोबळमानाने अर्थ.
खुरटणे = वाढ खुंटणे,
तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत
ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे
////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

Sunday, 15 August 2010

गगनांबरी तिरंगा ....!!



   गगनावरी तिरंगा ....!!

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!


तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!


                             गंगाधर मुटे
.................................................

(वृत्‍त : आनंदकंद)
.........**.............**.........**......

Saturday, 14 August 2010

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

                 गंगाधर मुटे
...................................

Wednesday, 11 August 2010

मुकी असेल वाचा

मुकी असेल वाचा 

कसा वाजवू टाळी, मी देऊ कशी दाद?
पहिला चेंडू छक्का, दुसर्‍या चेंडूत बाद

तुझे-माझे जमले कसे, करतो मी विचार
भाषा तुझी तहाची, मला लढायचा नाद

विसरभोळा असे मी सांगतो वारंवार
भूल पडते देणींची, घेणे असते याद

सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद

"अभय" तुझे ऐकुनिया तो चिडला असेल; पण,
मुकी असेल वाचा तर देणार कशी साद?

                                 गंगाधर मुटे
…………………………………………

Sunday, 8 August 2010

कुंडलीने घात केला

कुंडलीने घात केला

कसा कुंडलीने असा घात केला
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला

विचारात होतो अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला

खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?

दिशा दर्शवेना, मती वाढवेना
कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला?

"अभय" चेव यावा अता झोपल्यांना
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला
      
                गंगाधर मुटे
...................................................
(वृत्त-भुजंगप्रयात)

Tuesday, 3 August 2010

पराक्रमी असा मी : हझल

पराक्रमी असा मी : हझल


माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो

ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही
उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो

प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी
अंधार ही अताशा संगे मलाच नेतो

त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली
टुणकण उडून गजरा खोचून छान देतो

फ़िर्याद ही जरासी घेवून आज येता
कैवार रक्षणाचा खुर्चीत का दडे तो?

उच्चांक गाठतांना बेबंद धूर्ततेचा
उंटीणिला शिडीने चंगून चुंबते तो

ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
बस धन्यवाद केवळ सर्वास आवडे तो

ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का "अभय" तुज दिसे तो?

                                 गंगाधर मुटे
………………………………………
चंगने = चढणे
………………………………………