Saturday, 17 July, 2010

रानमेवा खाऊ चला....! (बालकविता)

रानमेवा खाऊ चला....! (बालकविता)


या झरझर या, जरा भरभर या,
चला रानोमाळी भटकू चला
कुणी अंजीर घ्या, कुणी जांभुळ घ्या,
थोडा रानमेवा खाऊ चला ....॥१॥

(लाला, लरला, लरलल्लरलल्लर ला,
लरलल लरलल लरलल लरलल
लरलल्लरलल्लर ला)

ते उंच-उंच दिसते ते, ते फ़ळ ताडाचे आहे
झाडांच्या डोक्यावरूनी, सूर्याचे किरण ते पाहे
कुणी कळवंद खा, कुणी चिक्कु-पेरू खा,
पाणी नारळाचे पिऊया चला ....॥२॥

ते फ़ुगले डोळे दिसते, ते सिताफळाचे आहे
खोप्यांच्या खिंडीमधुनी, ते चोरुनी पाडस पाहे
कुणी अननस खा, कुणी बोरं-लिंबू खा,
पाड आंबे वेचूया चला ....॥३॥

ही झाडे आहे म्हणुनी, सरसर पाऊस येतो
धरणांचे पोट भरुनी, धरणीला न्हाऊन जातो
कुणी टरबूज खा, कुणी खरबूज खा,
झरा झुळझुळ पाहू चला ....॥४॥


ही झुडपे-झाडे-वल्ली, सजीवांना अभय ती देती
ती सोडती ऑक्सिजनला अन कार्बन शोषूनी घेती
कुणी कलमा घ्या, कुणी रोपटी घ्या
झाडे घरोघरी लावुया चला ......॥५॥


(हाहा, हेहेहे, चिंगचिंगंचिंगचिंगंच्या,
टणणण टणणण ढणणण ढणणण
तारारमपमपमपमपा)

                                       गंगाधर मुटे
...........................................................

No comments:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.