Wednesday 7 July, 2010

नाचू द्या गं मला : लावणी

नाचू द्या गं मला : लावणी

गेली रोहिनी, मिरूग आला, आल्या पावसाच्या धारा
थेंब टपोरे चोळी भिजविती, पदर खेचतो वारा
कुलीनघरची जरी लेक मी
मला बंधात जखडू नका
जाऊ द्या गं मला पावसात अडवू नका
भिजू द्या गं मला पावसात अडवू नका
नाचू द्या गं मला पावसात अडवू नका ...॥धृ०॥

कोरस :- वेल कोवळी नवथर भेंडी, हिला पिंज‍र्‍यात दडवू नका
            नाचू द्या गं हिला पावसात अडवू नका

कडकड करुनी विजा नाचती
गडगड गर्जन मेघ गर्जती
तरी जरा ना भिती वाटते
झंकार सूरांचे कानी दाटते
पाय थिरकण्या पुलकित करिती
देई टाळी मोर आणिक मयुरी ठुमका ..... ॥१॥

या जलधारा मस्ती करोनी
थेंब मारिती नेम धरोनी
सर्वांगाशी झोंबित सारा
गुदगुली करितो अवखळ वारा
नसानसातुनी उधान वाहे
गिरक्या घेते तरी ना थकते, मी नाजुका .....॥२॥

जाऊ एकली नकोच रानी
आई वदली हळूच कानी
घडे असे का मला न कळते
तनामनातुनी काय सळसळते
तरी खेळू द्या अभयाने मज
या धारांच्या पुढती सारा, अमृतघटही फ़िका ....॥३॥

                       गंगाधर मुटे
...................................................................

No comments:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.