Sunday, 9 May 2010

माय मराठीचे श्लोक...!!


माय मराठीचे श्लोक...!!
       ( वृत्त - भुजंगप्रयात )
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रम्हांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
"अभय" एक निश्चय मनासी करावा
ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
गंगाघर मुटे "अभय"
..................................................

Saturday, 8 May 2010

चापलूस चमचा : नागपुरी तडका

चापलूस चमचा : नागपुरी तडका

हलक्या-पतल्याचा जमाना, राह्यलाच नाही
श्याम्यासारखा इब्लिस, म्या पाह्यलाच नाही...

पोम्याले म्हणे तुनं, शरम काहून विकली
मिशी पकून गेली तरी, अक्कल नाही पिकली
मुकरदमच्या चपला, चक्क डोक्यावर घेते
एवढा कसा लाचार, त्यायचे धोतरं धूते
असा चापलूस चमचा, म्हणे झालाच नाही ...

चारचौघात गेला तं, अक्कल तारे तोडते
शोकसभेत बोलंण तं, जम्मून भाषण झोडते
असे गुण गावते, जे मयतात असण-नसण
याचं भाषण आयकून, थो मुर्दा हासत असण
देवळामंधी हार कधी, वाह्यलाच नाही....

थेटरमंधी जाईन तं, सुदा नाय बसणार
समोरची खुर्ची भेदून, याची तंगडी घुसणार
तमाशातल्या बाईवर, नोटा-बंडल लुटते
दमडीसाठी भिकार्‍याले, अक्कल सांगत सुटते
जिंदगीचा डाव "अभय", हारलाच नाही ...

                        गंगाधर मुटे
..........................................................

Friday, 7 May 2010

धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका


धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका
धकव रं श्यामराव झोल नको खावू
नशीबाची गाथा नको कोणापाशी गावू....!
रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा
कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला
उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला
दोघाचबी गर्‍हाणं सारखच हाय भाऊ ...!
मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्‍हे
खरीददार म्हणे ह्या गहू होय का जिरे?
आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही
घेवून जा वापस नायतर धडगत नाही
नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हावू?....!
पदवीची पुंगी घेवून पोरगं वणवण फ़िरते
डोनेशनबिगर कुठं नोकरीपाणी मिळते?
चपराशाचा भाव सध्या सात लाख सांगते
मास्तरसाठी अभयानं बारा लाख मांगते
"नोकरीले मार गोली" म्हणलं खेतीवाडीच पाहू....!
गंगाधर मुटे
......................................................
ढोबळमानाने शब्दार्थ.
झोल खाणे = कच खाणे.माघार घेणे.
उंबई = ओंबी, गिर्‍हे = ग्रह
......................................................

Sunday, 2 May 2010

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरूपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

गंगाधर मुटे

…………………………………………..
ही रचना गेय असल्याने समर्पक
चाल योजुन सहज गाता येईल.
…………………………………………..

कविता म्हणू प्रियेला

कविता म्हणू प्रियेला

कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी?
'' साहित्यचोर न टपो '' या काळजीत मी

अपराध काय माझा ते तूच सांगना
लेखी तुझ्या उरावा माझा अतीत मी

अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता
जगणे अवखळ माझे अन टवटवीत मी

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

अभयास अभ्रकाचे छप्पर नसे जरी
नक्षत्र पांघरूनी या झोपडीत मी

गंगाधर मुटे
..................................................
वृत्त - 'विद्युलता'
गागाल गालगागा, गागाल गालगा
.................................................

Saturday, 1 May 2010

लकस-फ़कस : नागपुरी तडका

लकस-फ़कस : नागपुरी तडका

काहून बाप्पा रंगराव, लकस-फ़कस चालता
खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालता....!!

’सहकारात’ होते तेंव्हा, काय तोरा व्हता
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया
पद गेल्याच्यानं आता, गोमाश्या हाकलता....!!

म्हणा काही रंगराव, गणित तुमचं चुकलं
विरोधात बसले म्हून, खिसे भरणं हुकलं
बाकीच्यायनं थातुरमातूर, टोपीपालट केली
दोन पिढ्या बघा कशी, गरीबी हटून गेली
पब्लीकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ....!!

होय-नोय उठ-सूठ, विमान वार्‍या करता
खुर्चीच्या लोभापायी, दिल्लीत पाणी भरता
जनतेचे प्रश्न जरा, "अभय"पणे मांडा
मनका टाईट ठेवूनशान, खमठोकपणे भांडा
हायकमांडच्या गुरकावणीले थरथर हालता ...!!

.....गंगाधर मुटे..
................................................................
ढोबळमानाने शब्दार्थ:
लकस-फ़कस = बेडौल
मांजरपाठ = स्वस्त व जाड धोतर
................................................................

Saturday, 24 April 2010

हे रान निर्भय अता....


हे रान निर्भय अता....
हे रान निर्भय अता,वाघास दात नाही
त्या बोळक्या मुखाने,काहीच खात नाही
नुसत्याच थयथयाटी, कल्लोळ हो सुरांचा
झंकारणे सुरानी, त्या घुंगरात नाही
वणव्यात त्या तरुंचे, अर्धांग भस्म झाले
तेही वसंत वेडे ऋतु, गीत गात नाही
लादू नये अपेक्षा भरपूर पालकांनी
आनंदही अताशा, त्या शैशवात नाही
बाणा कसा जपावा,लवचीक जो कणा ना
अभिमान "मी मराठी" मुळचा घरात नाही
चौफेर वेढलो मी, फासेच मांडती ते
समरांगणा भिणारी,माझी जमात नाही
छळले मला कितीही, लखलाभ हो तयांना
अभयात नांदतो मी, किल्मिष मनात नाही
.
.............. गंगाधर मुटे.
........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................

चंद्रवदना ...

चंद्रवदना ...

मृदगंध पसरला, घुमली शीळ लाघवी ती
पळते खिदळत सर की, चंद्रवदना नवी ती?

रुतले सदैव काटे, गजर्‍यास गुंफताना
ती कमनशीब पुष्पे, वेणीस लाजवीती.

कित्येकदा झर्‍यांना, लाटा गिळून घेती
घेणार जन्म तेथे, कल्लोळ,यादवी ती.

बोलायचे तुला जे, ते बोल निश्चयाने
शंका कदाचित तुझी, असणार वाजवी ती.

छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती.

..... गंगाधर मुटे ..

........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................

Thursday, 22 April 2010

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका


श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥

जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे

.....................................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकूल = पुर्णपणे.
....................................................................
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
...................................................................


.......................................................................

Sunday, 18 April 2010

पुढे चला रे...

पुढे चला रे....

चेतलेल्या तेलवाती शांत नाही
चालतांना वाट ही विश्रांत नाही.

नेमलेले लक्ष्य आवाक्यात आहे
ना तमा वा सावजाची भ्रांत नाही.

वेदनांची पायमल्ली फार झाली
झुंज शौर्याने अर्जी आकांत नाही.

आजमावुन एकदा घे तू लढाई
सोक्षमोक्षाविन अता मध्यांत नाही.

घे भरूनी पोतडी दोन्ही कराने
हा विरक्ती साधकांचा प्रांत नाही.

.गंगाधर मुटे.
...........................................
वृत्त - गालगागा X 3
...........................................

Saturday, 17 April 2010

नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

कायरं श्याम्या इथंतिथं झ्यामल-झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

ईचीबैन हे गजकरण भलतच भारी असते
चहाड्या-चुगल्या केल्याबिना पोट भरत नसते
अफवा पेरासाठी लोकायचे कानफट पाजवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

याची टोपी त्याच डोस्क, काट्याने काटा काढतोस
साथ देईन त्यालेच तु, तोंडबुचक्या पाडतोस
सिध्यासाध्या असामीले, बोटावर नाचवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

समोरच्या तंगडीमध्ये, आडवी तंगडी घालतोस
त्याले उबडं पाडूनशान, त्याच्या म्होरं चालतोस
समद्यायले झाशा देवुन, अभये  भाकरी भाजतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

..गंगाधर मुटे..

( नागपुर आणि आसपासच्या काही जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा एक आगळी बोलीभाषा आहे. ही भाषा वर्‍हाडी,झाडी मध्ये पण मोडत नाही. त्यामुळे या प्रकाराला 'नागपुरी तडका' हे नांव शोभुन दिसेल असे वाटते.)
.....................................................................
मोंढा = पाठीचा खांद्यालगतचा भाग.
इतर शब्दांचे अर्थ समजुन घ्यायला कठीन नाहीत.
.....................................................................

ता.क- कवितेत जरी "मोंढा" हा शब्द असला तरी त्याऐवजी कवितेचा भावार्थ अधिक परिणामकारक करण्याच्या हेतुने कविता वाचतांना किंवा गातांना मोंढ्याऐवजी दुसरा पर्यायी शब्द-ज्याला जो आवडेल तो- वापरायला काहीही हरकत नाही.

नाते ऋणानुबंधाचे....!!


नाते ऋणानुबंधाचे..

ऋणानुबंधाचे...... ते हक्क सांगताना
पुलकित होय अवनी, ओहळ रांगताना...!

का उठती रोमांच? अलगद स्पर्श होता
ते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ....!

गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणे
शहारते पाकळी, पतंग खेळताना ......!

अस्पर्श रक्षिलेला, जपुन जतन ठेवा
ते हृदयही कंपित, तार छेडतांना ......!

स्पर्श उत्कटतेचे, सख्यास बळ देते
तन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना...!

फेकुनी दूर अभये, शाल काळोखाची
रजनी लेत लाली, भानू उगवताना...!

..गंगाधर मुटे

Friday, 16 April 2010

हे गणराज्य की धनराज्य?

हे गणराज्य की धनराज्य?

प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!

एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगुलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदान्ध उन्मत्तशाही...!!

डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवित नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!

विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवण भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालकं मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडूंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला आटोका ना, सुस्त झाली दंडशाही...!!

गंगाधर मुटे
---------------------------------------------------
काही शब्दांचे मोघम अर्थ
प्रजापती,सुलतान,नृप = राजा
प्रगल्भ = परिपक्व
लांगुलचालन = खुशामत
मदांध = माजलेले
धनमत्ता = मालमत्ता
उद्दाम = बेफाम
सुगी = समृद्धी
पोटपाणी = उदरनिर्वाहाची साधने.
यौवण = तारुण्य.
-----------------------------------------------------

Thursday, 15 April 2010

हवी कशाला मग तलवार ?

हवी कशाला मग तलवार ?

मकरंदाहुनि मधुर तरीही
शर शब्दांचे धारदार
तळपत असता जिव्हा करारी
हवी कशाला मग तलवार ?......!!

शब्दच असती कवच कुंडले
शब्दच चिलखत होती
शब्दच होती आयुधे ऐसी
नभास भेदुनि जाती
शब्द खड्ग अन शब्द ढालही
परतवती ते हर वार.......!!

नवनीताहुन मऊ मुलायम
कधि कणखर वज्रे
आसवांनी भिजती पापण्या
कधि खळखळ हसरे
हीनदिनांचे सांत्वन करिती
गाजविती दरबार....!!

भुंग्यासम शब्दांची गुणगुण
कधि व्याघ्राची डरकाळी
शब्द फटाके,शब्द फुलझडी
कधि नीरवता पाळी
जोशालागी साथ निरंतर
कधि विद्रोही फूत्कार ....!!

सृजनशीलता-करुणा-ममता
संयम विभूषित वस्त्रे
हजरजबाबी, तलम,मधाळहि
परि कधि निर्भिड अस्त्रे
पांग फेडण्या भूचे अभये
तळहातावर शिर शतवार ...!!

गंगाधर मुटे

Wednesday, 14 April 2010

नशा स्वदेशीची...!!

नशा स्वदेशीची...!!

आज रात्रीच्या मध्यात असे काय घडणार आहे?
जुन्याचा खातमा होऊन नव्याची स्थापना होणार आहे?
की व्यवस्थेचे शेंडाबूड परिवर्तन होणार आहे?
निराशेला बुडवून आशेला कोंब येणार आहे?
की उमेदीला भविष्य खांद्यावर घेणार आहे?
नेमके होणार तरी काय आहे?
फ़क्त हेच होणार की स्वप्नांचे मनोरे बांधले जाणार
आणि अवगुण गाळण्याचे संकल्प सोडले जाणार
मात्र अवगुण गळण्याऐवजी संकल्पच गळणार
तरीही आशा की... भविष्य उजळणार
अशा मंगल घटिकेला, चला एक एक ग्लास भरून घेवू
पळू नका गांधीप्रेमींनो, आज थोडासा विचार करून घेवू
ग्रामस्वराज,स्वदेशीचा अर्थ आज लागणार आहे
बदल्यात फक्त गावठीचा एक पेला मागणार आहे
इंग्रज गेल्यापासुन म्हणा अथवा
किल्ल्यावर तिरंगा फडकल्यापासून म्हणा
कुठेतरी,कधीतरी, उजेडात वा अंधारात
आढळल्यात त्या महात्म्याच्या पाऊलखूणा ?
हमरस्त्यावर बेदरकारपणे आणि अगदी एकमताने
त्या ग्रामसुराज्याच्या संकल्पनेला फासलाय ना चुना ?
पण इथे ग्रामोद्योगाचा मुलमंत्र साकारलेला दिसतो
मोहाफुलापासुन गावठीचा सुंदर प्रकल्प आकारलेला दिसतो
सरकारला सबसिडी इथे कोणीच मागत नसते
शिपाई,कलेक्टर,मंत्री सर्वांना नियमित हप्ते जात असते
ग्रामस्वराज्याची संकल्पना पचनी पडत नाही कारण
भगतसिंगासारखी नशा आता कुणालाच चढत नाही
खुर्चीच्या दलालांनी नारळ असं कसं फोडलं
नियतीने क्रित्येकांना गुत्त्यावर आणून सोडलं.
थोडी पोटात गेली आता अभयाने पडतोय  गिअर
पिल्या-बिनपिल्यांनाही मेनी मेनी हॅपी न्यू ईअर....................!!!!

गंगाधर मुटे
(३१-१२-२००९)