आता काही देणे घेणे उरले नाही
१) तृप्ततेची चमक
तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे
जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!
***
२) मर्यादा सहनशीलतेची
तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो
तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो
तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो
तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो
माझी सोशिकता संपायला आली.. पण
मर्कटचाळे, तुझे काही सरले नाही
बस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा
तुझे-माझे... आता काही... देणे घेणे.... उरले नाही
***
३) आत्मप्रौढी
मी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस
फ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस
तुझ्या पौरुषी अहंकारात
माझे अस्तित्वच नाकारले गेले
तुझ्या आत्मप्रौढी समोर
माझे आत्मक्लेश पुरले नाही
म्हणून मलाही तुझ्या अहंमन्यतेशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!
***
४) फ़टाकडी
तू आलीस आणि घुसलीस
हृदयाची सारी दारे ओलांडून
थेट ....... हृदयाच्या केंद्रस्थानी
तू असतेस..... तेंव्हा तू असतेस
तू नसतेस..... तेंव्हाही तूच असतेस
मला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू
त्यामुळे.. हो त्याचमुळे....."त्या फ़टाकडीशी"
माझे आता, काही देणे घेणे उरले नाही.....!!
गंगाधर मुटे
..........................................................
No comments:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.